JavaScript is not enabled.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

   १. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ कोणाला लागू आहे ?
   ⇨ मुंबई दुकाने आणि आस्थापना अधिनियम १९४८, कारखाने अधिनियम १९६१, मोटार वाहतूक कामगार कायदा १९४८ या तीन कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या आणि ज्यात किमान ५ कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांना हा कायदा लागू आहे. यात विविध कंपन्या, आस्थापना, कारखाने, टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सी, बँका आदींचा समावेश होतो.

   २. या अधिनियमानुसार कामगार म्हणजे कोण ?
   ⇨ कामगार / कर्मचारी म्हणजे एखाद्या व्यापारी संस्थेत कोणतेही काम करण्यासाठी, मग ते कुशल असो किंवा अकुशल असो, (अंगमेहनतीचे, कारकुनी, पर्यवेक्षकीय किंवा तांत्रिक असो) मजुरीने किंवा बक्षिस देऊन कामावर लावलेली कोणतीही व्यक्ती यात मोडते. तथापी, व्यवस्थापकीय किंवा पर्यवेक्षकीय (रु.२५००/- पेक्षा अधिक वेतन असणारी व्यक्ती) स्वरुपाची कामे करीत असलेल्या व्यक्तींचा यात समावेथ होत नाही.

   ३. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी म्हणजे काय ?
   ⇨ कामगारांचा दर ६ महिन्यांनी जून आणि डिसेंबरमध्ये मंडळाकडे निधी भरणे बंधनकारक आहे. दरमहा रु.३०००/- पेक्षा जास्त पगार घेणाऱ्या सर्व कामगार / कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रु.१२/- कपात केले जातात. सोबत प्रत्येक कामगारामागे मालकाने रु.३६/- जमा करावयाचे असतात. आणि राज्यशासनाने प्रत्येक कामगारामागे रु.२४/- मंडळाकडे जमा करावयाचे असतात. या निधीतून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

   ४. आस्थापना / कंपनी यांनी मंडळाकडे नोंदणी करुन घेण्याची प्रक्रिया काय आहे ?
   ⇨ नवीन आस्थापना नोंदणीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर तसेच मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे फॉर्म उपलब्ध आहे. मंडळाकडे फॉर्म जमा करावा. त्यानंतर संबंधित आस्थापनेची नोंदणी करुन एक कायमस्वरुपी कोड नंबर दिला जातो.

   ५. कामगार कल्याण केंद्राच्या वेळा काय आहेत ?
   ⇨ सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० ही कामगार कल्याण केंद्रांची वेळ आहे. त्यातील सकाळी ११ ते सायंकाळी ५ ही वेळ महिला व मुलांच्या उपक्रमांसाठी राखीव असते. सार्वजनिक सुट्टी, दुसरा व चौथा शनिवार तसेच सर्व रविवार ही केंद्र बंद असतात.

   ६. मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क साधावा ?
   ⇨ ज्या व्यक्तिंना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी नजीकच्या कामगार कल्याण केंद्राशी संपर्क साधावा. या केंद्रात सभासद फॉर्म व संबंधित योजना/उपक्रमाचा भरुन लाभ घेता येतो.

   ७. एका योजनेचा लाभ घेतल्यानंतर त्याच व्यक्तिला दुसऱ्या योजनेचे लाभ घेता येतो काय ?
   ⇨ आवश्यक नियम-अटींची पुर्तता करत असल्यास लाभ घेता येतो.

   ८. मंडळाच्या विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक आहे काय ?
   ⇨ मंडळाच्या कार्यक्रमांची कालबद्ध सूची तयार करण्यात आली आहे. तथपी, वेळापत्रकाबाबत नजीकच्या कामगार कल्याण केंद्र व कार्यालयाशी संपर्क साधावा.

   ९. गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेचा लाभ कुणाला मिळतो ?
   ⇨ कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ घेता येतो. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड, एड्स तसेच इतरही अनेक गंभीर आजाराच्या उपचारासाठी ही मदत मिळते. रुग्णाला आधी स्वत: खर्च करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाच्या आत मंडळाकडे आवश्यक कागदपत्रांसह सदर योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. खर्चाचे स्वरूप पाहून जास्तीत-जास्त २५,०००/- पर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते.

   १०. सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कुणाला मिळतो ?
   ⇨ कामगार पाल्यांना इयत्ता नववी पास झाल्यानंतर पुढील सर्व शिक्षणासाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करता येतो. मागील वर्षी किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक असून पुढील शिक्षण सुरु असावे.

   ११. पाठ्यपुस्तक सहायता योजना म्हणजे काय ?
   ⇨ इयत्ता ११ वी पासून पुढील सर्व शिक्षणासाठी ही योजना आहे. यात कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके खरेदीच्या ५० टक्के रक्कम अनुदान दिले जाते. गाईड व इतर संदर्भपुस्तक खरेदीसाठी अनुदान दिले जात नाही.

   १२. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार कुणाला दिला जातो ?
   ⇨ सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या कामगारांस या पुरस्काराने गौरविले जाते. रु.१५,०००/-, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर कर्मचारी / कामगाराची किमान ५ वर्ष नोकरी झालेली असावी.

   १३. कामगार भूषण पुरस्कारासाठी कधी अर्ज करता येतो ?
   ⇨ गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या १० वर्षांनी या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो.